कलेचा सांस्कृतिक वारसा जपलेल्या 'द कोल्हापुरी' या पुस्तकाचा जागतिक स्तरावर सन्मान

<p>कलेचा सांस्कृतिक वारसा जपलेल्या 'द कोल्हापुरी' या पुस्तकाचा जागतिक स्तरावर सन्मान</p>

कोल्हापूर -  केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीतच देश विदेशात नावलैकिक मिळवला आहे. ग्रामीण कारागीरांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपारिक कोल्हापूर ज्वेलरी आणि हॅडमेड बास्केट या सारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. २०१५ मधील मिलान फॅशन वीकदरम्यान आंतरराष्ट्रीय ब्रँड 'प्राडा'ने कोल्हापुरी चपलेसारख्या हुबेहूब डिझाईनची पादत्राणे सादर केली होती, परंतु त्याचे श्रेय कोल्हापूरच्या मूळ कारागिरांना दिले नव्हते. त्याचा निषेध नोंदवण्याऐवजी कलापुरीने वेगळा मार्ग निवडला. कलापुरी या कारागिरांच्या संस्थेने आणि व्हीएमएल इंडिया या एजन्सीने थेट कोल्हापुरी चपला सारखे हाताने शिवलेले, चामड्याचे 'द कोल्हापुरी' हे कॉफी टेबल पुस्तक तयार केले. या पुस्तकात या कलेचा हजार वर्षाचा प्रवास आणि त्यामागील कारागीरांची माहिती आहे. या पुस्तकास एकूण अकरा क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्डस प्राप्त झाले आहे. या अवॉर्डमधील सर्वोच्च असलेला ब्लॅक एलिफंट हा पुरस्कारही कलापुरीने प्राप्त केला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रसिध्द सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहूल मॅथ्यु आदिंनी ज्युरी म्हणून काम पाहिले होते. जाहिरात आणि क्रिएटीव्हीटीच्या क्षेत्रात हा अवॉर्ड जागतिक स्तरावरचा सन्मान समजला जातो, अशी माहिती कलापुरीच्या संस्थापिका अपर्णा चव्हाण यांनी दिली.

या पत्रकार बैठकीला आतिष चव्हाण, प्रा. श्रीधर वैद्य, व्यवस्थापिका अमृता काळे उपस्थित होत्या.