सीपीआर प्रशासनाला आरोग्य मंत्र्यांचा विसर ; महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कोल्हापूर - शहरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय प्रशासनाला आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विसर पडला असल्याची चर्चा रंगली आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर रुग्णालयाचा कायापालट होत आहे. आज 250 कोटी रुपये निधी खर्च करून सीपीआरमधील विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. यावेळी सोहळ्याचे उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ. राजेश क्षीरसागर तसेच प्रमुख उपस्थित म्हणून महापौर रूपाराणी निकम यांचा फोटो सर्वत्र झळकला आहे. परंतु राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा फोटो सीपीआर प्रशासनाने सोयीनुसार डावलल्याने महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे जिल्ह्याला वैद्यकीय हब बनवण्याचा मंत्र्यांचा प्रयत्न सुरू असताना इतक्या मोठ्या सोहळ्याच्या जाहिरातीत पालकमंत्र्यांचा फोटो टाकण्यास रुग्णालय प्रशासनाला पडलेला विसर खेदजनक असल्याने उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला आहे.