नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची कोल्हापूर महानगरपालिकेला भेट...
कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली आहे. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत महापालिकेतील विविध प्रलंबित प्रश्न, आर्थिक अडचणी, कर्मचारी विषय, शहर विकास, वाहतूक कोंडी, पूरस्थिती आणि अंबाबाई मंदिर परिसर विकास यावर चर्चा झाली. सुरुवातीला महानगरपालिकेत आगमन होताच अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह गटनेते इंद्रजीत बोद्रे, प्रविण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आढावा बैठकीपूर्वी कोल्हापूर शहरातील प्रश्नांची माहिती दिली. यामध्ये महापालिकेची आकृतीबंध सेवा नियमावली प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, नवीन कर्मचारी भरतीला मान्यता द्यावी आणि फेरीवाला झोन समितीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी केली. अंबाबाई मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजनाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नो डेव्हलपमेंट झोन, विविध आरक्षण प्रश्न आणि कोल्हापूर महापालिकेला जीएसटी अनुदानात २५ टक्के वाढ मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी, कोल्हापूर शहराला 'ड' वर्गातून 'अ' वर्गात आणण्यासाठी शासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. गटनेते आदिल फरास यांनी, कर्मचारी प्रश्न, केएमटी आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत शहरातील पूरस्थिती आणि रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. ईईएसएल कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. नगरसेवक विजय खाडे यांनी, केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणाची चौकशी करून फौजदारी दाखल करावी, अशी मागणी करत पंचगंगा नदी प्रदूषण आणि क्रीडा सुविधांबाबत लक्ष वेधले.
यावेळी डॉ. गोविंदराज यांनी, महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत आर्थिक शिस्त, काटकसर आणि उत्पन्नवाढीवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागांचे व्यावसायिकरण, हद्दवाढ, पर्यटन सुविधा आणि उद्योजकता वाढ यावर धाडसी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट करत शहराच्या विकासाच्या दृष्टिने चांगले पाऊल उचलले जाईल, असे सांगितले.
दरम्यान, डॉ. गोविंदराज यांच्या भेटीनंतर महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार का याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते इंद्रजीत बोद्रे, आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारगंधर देशमुख, प्रविण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.