क्रियाशील आयुक्त... पण निष्क्रिय कार्यालय? दोन महिने उलटले तरी डॉ. राजेंद्र भारूड यांचे नाव फलकावरच नाही !
आयुक्त कार्यालयात दोन-दोन सहाय्यक अधीक्षक असतानाही ‘साधं काम’ रखडलं कसं?
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेवर डॉ. राजेंद्र भारूड यांची आयुक्तपदी नियुक्ती होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले आहेत. शहर प्रशासनात वेग, शिस्त आणि पारदर्शकता आणण्यासाठी ओळखले जाणारे डॉ. भारूड कामाच्या बाबतीत अत्यंत क्रियाशील अधिकारी म्हणून सध्या चर्चेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय कारभार आता उघडपणे समोर येऊ लागला आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्तांच्या दालनाबाहेर लावण्यात येणाऱ्या अधिकृत नावाच्या फलकावर अद्यापही डॉ. राजेंद्र भारूड यांचे नाव झळकलेले दिसत नाही. दोन महिने उलटूनही इतकं साधं आणि औपचारिक काम पूर्ण न होणं हे प्रशासनातील ढिसाळ कारभाराचं जिवंत उदाहरण मानलं जात आहे.
विशेष म्हणजे, आयुक्त कार्यालयात एक नव्हे तर दोन-दोन सहाय्यक अधीक्षक कार्यरत असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. मग इतक्या मनुष्यबळाच्या उपस्थितीतही आयुक्तांच्या नावाचा साधा फलक बदलण्यास प्रशासनाला वेळ का मिळाला नाही? असा संतप्त सवाल आता महापालिका वर्तुळातून उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिकेत कर्मचारी टंचाईचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात काही विभागांमध्ये अतिरिक्त व्यवस्था करूनही मूलभूत कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचं हे उदाहरण असल्याचं बोललं जात आहे. “कामापेक्षा खुर्ची सांभाळण्यातच काही कर्मचारी व्यस्त आहेत का?” अशी उपरोधिक चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे.
डॉ. भारूड हे निर्णयक्षम आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. शहरातील विविध विभागांची पाहणी, प्रलंबित कामांचा आढावा आणि प्रशासनात शिस्त आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी अजूनही जुन्याच ढिसाळ पद्धतीने काम करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. एका बाजूला आयुक्त शहर सुधारण्यासाठी धडपड करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांत नावाचा फलक बदलता येत नाही, ही बाब प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी मानली जात आहे.
आता प्रश्न एवढाच..डॉ. भारूड यांच्या कार्यशैलीला साजेसं सक्षम आणि जबाबदार प्रशासन उभं राहणार का? की “फलक बदलायलाच दोन महिने” घेणारं हेच संथ प्रशासन पुढेही शहराचा कारभार चालवणार?