डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या योगेश परमेश्वर घुलेची "गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६" म्हणून निवड

<p>डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या योगेश परमेश्वर घुलेची "गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६" म्हणून निवड</p>

कोल्हापूर - विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी डी वाय पाटील पॉलिटेक्निक सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची "गुगल जेमिनी अँड ए आय अंडर गुगल स्टुडन्ट अँबॅसेंडर २०२६" म्हणून नुकतीच निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधील सर्व पॉलिटेक्निक मधील असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.

त्याच्या या निवडीनंतर संस्थेचे विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील यांनी त्याचा आज सत्कार केला. यावेळी डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्र कुलपती ऋतुराज पाटील यांनी, योगेश घुले याने पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेताना एवढ्या कमी वयात गुगल स्टुडन्ट अँबॅसेंडर म्हणून मिळवलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे सांगून योगेशच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी, हा सन्मान पॉलिटेक्निकसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. योगेश हा मूळचा माळशिरस येथील असून सध्या डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकतो आहे. त्याने गुगलकडे याबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. अॅप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाईन इंटरव्ह्यू, या विषयाचे ऑनलाईन प्रेझेन्टेशन या सर्व गोष्टी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्याला मिळालेले अँबेसेंडर पद एक वर्षासाठी आहे. या वर्षभरात तो इतर विद्यार्थ्यांना गुगल जेमिनी, ए आय याबाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन आणि जनजागृती करणार आहे. आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने कॉलेजला पाठवले, त्यामुळे काहीतरी वेगळे करावे अशी इच्छा होती. यातूनच हे यश मिळाल्याचे योगेशने सांगितले.

यावेळी डी वाय पाटील पॉलिटेक्निकच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शिंदे, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, सत्यजित रोकडे आदी उपस्थित होते.