केएमटीतील रोजंदारी आणि अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या : सभापती सत्यजित जाधवांची मागणी

<p>केएमटीतील रोजंदारी आणि अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या : सभापती सत्यजित जाधवांची मागणी</p>

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत केएमटी विभागातील रोजंदारी आणि अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे. 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा परिणाम केएमटीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
केएमटी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठी नगरविकास कार्यालयाकडे हे प्रकरण तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठीही प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या दोन्ही प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय होत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचारी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अल्प मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
यावेळी आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक प्रसाद जाधव, रोहन अतिग्रे, युनियनचे अध्यक्ष सचिन जाधव आदी उपस्थित होते.