इचलकरंजीत कृष्णा नळपाणी योजनेच्या पाइपलाईनला गळती... लाखो लिटर पाण्याची नासाडी...
इचलकरंजी - शहराला कृष्णा नळ पाणी योजना आणि पंचगंगा नळ पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून कृष्णा नळ पाणी योजनेला वारंवार गळती लागत असून यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
शहराला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील कृष्णा नळ योजनेच्या पाइपलाईनला पुन्हा मोठी गळती लागली आहे. वाया जात असलेल्या या पाण्याचा वापर काही जण वाहने धुण्यासाठी करत आहेत. लहान मुलेही या पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन पाईपलाईन गळतीचा प्रश्न निकाली कधी काढणार, असा सवाल उपस्थित होत आहे.