आयपीएल बेटिंग रॅकेटचा मोठा भांडाफोड ; १०४ संगणकांसह ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

<p>आयपीएल बेटिंग रॅकेटचा मोठा भांडाफोड ; १०४ संगणकांसह ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त</p>

इचलकरंजी – शहरात अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणलेल्या आयपीएल बेटिंगमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत भाजपचा नगरसेवक नितेश पोवार याच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी आरोपींकडून तीन आलिशान चारचाकी वाहने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि अन्य साहित्य, असा सुमारे पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. मात्र तपासादरम्यान मुख्य आरोपी विलास बडवे याच्या घरावर पुन्हा छापा टाकला असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात संगणकांचा साठा आढळून आला. घरातून तब्बल १०४ संगणक जप्त करण्यात आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. हे सर्व संगणक आयपीएल बेटिंगसाठी वापरले जाणार होते. आयपीएल सामन्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बेटिंग नेटवर्क चालवण्यासाठी हे संगणक आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील सर्व आरोपी park २४५७, कॉम आणि park ३३३. कॉम या संकेतस्थळाचा वापर करून सट्टा खेळणाऱ्यांना युजर आयडी पासवर्ड देवून खेळण्यास प्रवृत्त करत होते. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केला जात होता. मोठ्या अलिशान गाड्यांमधून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन गाडीत बसून लॅपटॉप आणि मोबाईलमधून बेटिंग घेत होते. जर एखाद्या युजरने पैसे जिंकले तर त्याला त्याच अॅपद्वारे पैसे दिले जात होते. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती आता इचलकरंजीपुरती मर्यादित नसून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राजस्थानपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

यात आणखी काही राजकीय नेते तसेच नगरसेवकांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांकडून त्यादृष्टीने चौकशी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाकडून तपास वेगाने सुरू असून आयपीएल सट्टा रॅकेट  मागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.