‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रकरणी न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस...ट्विटर हँडलवर बंदी कायम
नवी दिल्ली - केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत कॉकरोच जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवर बंदी घातली आहे. या विरोधात कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. यावेळी केंद्राची ही कारवाई योग्य होती कि नाही याबाबत सरकारला जाब विचारत न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे.
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) ट्विटर खाते तात्काळ सुरू करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने हे प्रकरण आयटी नियमांनुसार गठीत करून 'आढावा समिती'कडे वर्ग केले आहे. त्यामुळे या समितीच्या तपासात खाते ब्लॉक करण्याची कारवाई चुकीची आहे, हे निदर्शनास आल्यास ही समिती स्वतः हे खाते सुरु करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा जुलै रोजी होणार आहे.