मराठा आरक्षणाला पाठिंबा; एससी-एसटी, ओबीसींवर अन्याय नको : रामदास आठवले
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यावर तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देताना आठवले यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.
कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. मात्र सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणणे न्यायालयात टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कालेलकर आयोगाच्या शिफारशींचा उल्लेख करत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या विद्यमान रचनेत बदल करताना सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
मराठा आणि ओबीसी समाजात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समिती स्थापन करण्यास आम्ही तयार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
एससी आरक्षणातील वर्गीकरणाबाबत बोलताना त्यांनी कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा विचार व्हावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विधान परिषदेत एक जागा तसेच दोन महामंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
दरम्यान, “आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे” हा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी कोल्हापुरात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.