पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टीका

<p>पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची टीका</p>

कोल्हापूर - आखाती युध्दाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षासाठी सोने खरेदी करु नका, खर्चात काटकसर करा, वर्क फ्रॉम होम करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. कोल्हापूर काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ नेते संपतबापू चव्हाण पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, वेदवती मोहिते आणि माजी नगरसेवक अॅडव्होकेट अमोल माने यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर जोरदार टीका केली.

यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार यांनी, यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एका डॉलरची किंमत साठ ते बासष्ठ रुपये असताना आकाश पाताळ एक करणारे भाजप आणि मित्र पक्ष आता मोदींच्या काळात एका डॉलरची किंमती शंभरी गाठत असताना गप्प का? असा सवाल उपस्थित करत मोदींच्या कथनी आणि करनी मध्ये अंतर असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष संपतबापू चव्हाण पाटील यांनी, सोन्या-चांदीवरील आयात शुल्कवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार असून कोणताही अभ्यास न करता किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेता निर्णय घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यांनी खासदार राहुल गांधीं बद्दलच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

वेदवती मोहिते यांनी, देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंट सरकार असून आर्थिक व्यवस्थापनात ते अपयशी ठरलंय, अशी टीका केली.

माजी नगरसेवक अॅडव्होकेट अमोल माने यांनी, नोटबंदीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा आरोप केला. सर्वसामान्यांना काटकसर करा म्हणून सांगितले जात असताना कुंभ मेळाव्यावर ३६ हजार कोटी खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित करत अॅडव्होकेट माने यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून तरुणांना स्वस्त मजूर बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी हे भोंदू खरात सारखेच आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या आवाहनानंतर जनतेत खूप मोठा असंतोष निर्माण झाला आहे. आता जनतेमधून मोठे आंदोलन होण्याची शक्यता असून काँग्रेसकडून देखील जनआंदोलन उभारण्यात येईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले आहे.