‘वाह मोदीजी वाह!’; विजय वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यास, सोने खरेदी टाळण्यास आणि बचतीवर भर देण्याचे केलेले आवाहन आता राजकीय वादाचा विषय बनले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर कडक टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “२०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज जनतेलाच त्याग करण्याचा सल्ला देत आहेत. पेट्रोल-डिझेल वापरू नका, सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी करा, असे सांगितले जात आहे. साहेब, देशाला बर्बाद करण्याचा कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची का?”
त्यांनी २००८ च्या जागतिक मंदीचाही उल्लेख करत, त्या काळात भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली होती, मात्र आज महासत्ता होण्याच्या दाव्यांदरम्यान सामान्य जनतेला त्याग करण्यास सांगितले जात असल्याची टीका केली.
याशिवाय, पाच राज्यांच्या निवडणुकांपर्यंत सरकारला युद्ध आणि आर्थिक संकटाचा विसर पडला होता का, असा सवाल उपस्थित करत “वाह मोदीजी वाह!” असा टोला देखील त्यांनी लगावला.