नीट यूजी’ परीक्षेवर गैरप्रकाराच्या संशयाचे ढग; एनटीएने तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविला

<h2>नीट यूजी’ परीक्षेवर गैरप्रकाराच्या संशयाचे ढग; एनटीएने तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविला</h2>

मुंबई : देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट यूजी’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविला आहे.

३ मे रोजी देशभरात नीट यूजी परीक्षा पार पडली होती. त्यानंतर ७ मे रोजी एनटीएला परीक्षेत गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली. यानंतर ८ मे रोजी हे प्रकरण पुढील चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्यात आले. तपास यंत्रणांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती एनटीएने दिली आहे.

राजस्थानमध्ये खासगी क्लासेसच्या सराव परीक्षांतील काही प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पेपरफुटीची चर्चा सुरू झाली असून राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन पथकाने (एसओजी) चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही काही खासगी क्लासेसच्या ग्रुपमध्ये असेच प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा पालक आणि विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

एनटीएने रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तपास यंत्रणांना सर्व तांत्रिक माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला असून चौकशीस पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.