विद्रोही साहित्य संमेलनात "शक्तिपीठ महामार्ग रद्द" चा ठराव मंजूर
सातारा : १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या संमेलनात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकांमध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्रात “विद्रोहीचं वादळ” घोंगावेल, असा इशारा दिला.
संमेलनात शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात आल्याची टीका करत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच किल्ले अजिंक्यताऱ्यावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांचे भव्य स्मारक उभारावे, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणीही ठरावांतून करण्यात आली.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, डॉ. भारत पाटणकर, कवी वाहरू सोनवणे, ॲड. वर्षा देशपांडे, डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाहरू सोनवणे यांनी “मानवजातीच्या अडचणींना ठोकर मारून पुढे जाणारा विद्रोह आहे,” असे सांगत समाजजागृतीची गरज व्यक्त केली. तर शाहीर संभाजी भगत यांनी पर्यायी सांस्कृतिक राजकारणात महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
संमेलनातील प्रमुख ठराव :
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा
किल्ले संवर्धनात इतिहासाला प्राधान्य द्यावे
शनिवारवाड्यासमोर महादजी शिंदे व मल्हारराव होळकर यांचे पुतळे उभारावेत
साताऱ्यात प्रतिसरकारचे स्मारक उभारावे
शाळा बंद विरोधी आंदोलन करावे
एसटी वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत
जातनिहाय जनगणना करावी
बेळगावसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात जोडावेत
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा.