“कोल्हापुर जिल्ह्यात SIR मोहिमेची जनजागृती; काँग्रेस सक्रिय”

“नागरिकांनी स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करावं; अन्यथा मतदानाचा अधिकार धोक्यात” – आमदार सतेज पाटील

<p>“कोल्हापुर जिल्ह्यात SIR मोहिमेची जनजागृती; काँग्रेस सक्रिय”</p>

कोल्हापूर : नागरिकांनी स्वतःची मतदार माहिती वेळेवर अद्ययावत करून स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करणं आवश्यक आहे, अन्यथा मतदानाचा अधिकार रद्द होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणूक आयोगाकडून राज्यभर SIR (Special Intensive Revision) म्हणजेच विशेष पुनर्रिक्षण मोहीम राबविण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातही ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक करण्यावर भर दिला जात आहे. डुप्लिकेट नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंद करणे तसेच चुकीची माहिती दुरुस्त करणे या प्रक्रिया सध्या सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३३ लाख ६७ हजार ६५९ मतदार असून त्यापैकी २४ लाख ५२ हजार ४१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ९ लाख १५ हजार २४२ ( म्हणजे एकूण मतदारांच्या २७ टक्के) मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये शहरातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत SIR मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाच्या बूथ लेव्हल ऑफिसर्सना (BLO) सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्थलांतर आणि मतदार यादीतील माहिती अद्ययावत न केल्यामुळे अनेक त्रुटी निर्माण होत असल्याचे नमूद करत, या मोहिमेदरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन माहिती पडताळत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन माहिती दिली जाणार असून, नागरिकांना QR कोडद्वारे तसेच ९६७२५९९९९० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन व्हॉट्सअ‍ॅपवर सविस्तर माहिती मिळणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

दरम्यान, आमदार सतेज पाटील हे उद्या रविवारी कसबा बावडा येथील बूथ क्रमांक १८ येथे बीएलओ समवेत सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार असून मोहिमेची पाहणी करणार आहेत.

या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, संजय कांबळे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, भारती पोवार, बाळासाहेब चौगले, चेतन नरके, प्रकाश पाटील, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.