आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात मंगळवारी बुलढाण्यात मोर्चा : प्रशांत आंबी

<p>आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात मंगळवारी बुलढाण्यात मोर्चा : प्रशांत आंबी</p>

कोल्हापूर - शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला आहे. आमदार गायकवाड यांनी गुरुवारी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटत आहेत.

 या प्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.  शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत राजारामपुरी पोलिस ठाण्यात आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी जवळपास दीड तास ठिय्या मारून बसले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची ग्वाही दिल्यानंतर ते निघून गेले पण पोलिसांनी आमदार  पवार आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेल्यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशांत आंबी त्यांचे कुटुंबीय  तसेच डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर दखल पात्र गुन्हा दाखल करावा, यासाठी आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांची भेट घेतली. मात्र त्यांनी देखील दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर आंबी यांच्या समर्थकांनी रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा आणि 28 एप्रिलला बुलढाणा येथे आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी आंबी यांच्यासोबत आरती रेडेकर,स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, रघुनाथ  कांबळे, रवी जाधव, दिलीप पोवार, सुनील जाधव, दिलदार मुजावर, मुकुंद कदम, सीमा पाटील, सदाशिव निकम, व्ही डी पाटील, अॅड. बन्सी सातपुते आदी उपस्थित होते.