आशा व गटप्रवर्तकांचे थकीत मानधन तात्काळ द्या; अन्यथा जिल्हा परिषदवर मोर्चा — सिटूचा इशारा
कोल्हापूर : आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ जमा न केल्यास जिल्हा परिषदवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे आणि आशा व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांचे केंद्र सरकारकडून मिळणारे नियमित मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत आहे. कामाच्या मोबदल्यावर मिळणारे तुटपुंजे मानधनही ‘बजेट उपलब्ध नाही’ या कारणास्तव दिले जात नसल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
राज्य शासनाकडून काही प्रमाणात मानधन वेळेत दिले जात असले तरी ५६ इंडिकेटरवर काम करूनही त्याचा मोबदला मिळालेला नाही. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निवेदने देऊनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राज्याचे मार्च २०२६ चे वाढीव मानधन अद्याप मिळालेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून मानधन वितरित झाल्याचे सांगितले जात असले तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ते कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे आशा सेविका व गटप्रवर्तकांमध्ये संतापाचे वातावरण असून, थकीत मानधन तात्काळ जमा न केल्यास जिल्हा परिषदवर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.