'शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
कोल्हापूर - काँग्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात अनेक घटना इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रखर, जाज्वल्य, दैदिप्यमान, पराक्रमी इतिहास लोकांसमोर ठेवण्याऐवजी या पुस्तकातून खोटा इतिहास मांडण्यात आला असल्याचा आरोप विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या पुस्तकातून हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे 'वैचारिक खच्चीकरण' करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी. पुस्तकाच्या प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत.
शनिवारी अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महेश जाधव, हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या अश्विनी माळकर, सनातनचे डॉ. मानसिंग शिंदे, निरंजन शिंदे, विकास जाधव, शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे, अशोक गुरव, प्रसाद कुलकर्णी, शीलाताई माने, महेश चौगुले, रामभाऊ मेथे, सुहास चव्हाण, शशी बीडकर, मनोहर चैनानी, विक्रम जरग आदि उपस्थित होते.