कोल्हापूर शहरातील दोन लॉजवर मनपाची कारवाई
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज सकाळी धडक कारवाई करत माळकर तिकटी, मटण मार्केट, बडे मस्जिद, गंजी गल्ली ते थेट बिंदू चौक परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. तसेच अनधिकृतपणे सुरु असलेल्या हिंदू लॉजिंग आणि प्राईम रेसिडेन्सी यात्री निवास या दोन लाॅजिंगवरती कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुरेशा पोलीस बंदोबस्तात आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभाग पथकाच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण हटवल्यामुळे रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांना इशारा मिळाला असून, अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांवर प्रशासनाची कारवाई यापुढेही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.