सोनम वांगचुक यांच्या जीवासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल... वांगचुक यांच्या जीवाला गंभीर धोका : याचिकेत दावा
नवी दिल्ली - पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा १८ वा दिवस आहे तरीही केंद्र सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते. यासाठी वकील राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सोनम वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून आवश्यक असल्यास वैद्यकीय देखरेखीखाली आहार द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
उपोषण सुरू झाल्यापासून वांगचुक यांचे वजन सुमारे 8.5 किलो घटले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. उपोषण असेच सुरू राहिल्यास पुढील दोन दिवसांत वांगचुक यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.