इचलकरंजीत जर्मन गँगच्या रुपेश नरवाडेला पोलिस कोठडी...
इचलकरंजी – शहरात जर्मन गँगच्या रुपेश नरवाडेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील लिगाडे मळा येथे राहणारे सितांजय भिसे हे २६ जुन रोजी एका अॅटो गॅरेजजवळ आले होते. त्यावेळी जर्मन गँगचा म्होरक्या म्हणून ओळखला जाणारा रूपेश नरवाडे तिथे आला. त्याने भिसे यांना अडवून तुझ्याकडील मोबाईल आणि पैसे मला काढून दे, अशी दमदाटी केली. भिसे यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्याने नरवाडे याने संतापून त्यांना कानशिलात लगावली. त्यानंतर शिवीगाळ करत लोखंडी घनाने पाठीवर प्रहार करून खिशातून जबरदस्तीने १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर नरवाडे पसार झाला होता. शिवाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नरवाडेवर यापूर्वी जबरीचोरी, मारहाण, दहशत माजवणे, असे गुन्हे दाखल आहेत.