भेसळयुक्त पदार्थांसह अन्न सुरक्षा विभागाची नजर आता मद्यनिर्मितीवर...
मुंबई – तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आता त्यांनी आपली नजर मद्यनिर्मितीकडे वळवली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिरिक्त फ्लेवर्सचा अनधिकृत वापर आणि वयोसंबंधित दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी कंपन्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
काही मद्यनिर्मिती कंपन्या रम, ब्रँडी, जिन, माल्ट किंवा ग्रेन व्हिस्की, वाईन आणि बिअर यांसारख्या उत्पादनांमध्ये नैसर्गिक चव आणि सुगंधाची नक्कल करणारे अतिरिक्त फ्लेवर्स मिसळत असल्याचे आढळले आहे. नियमानुसार या उत्पादनांमध्ये त्यांची मूळ नैसर्गिक चव आणि सुगंधच असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रकार नियमांचे उल्लंघन असल्याचे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.