पिण्याच्या पाण्यावरून पाचगाव ग्रामस्थ आक्रमक ; ग्रामस्थांकडून 'रास्ता रोको' चा इशारा
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील पाचगाव परिसरातील आर.के. नगर, शिवस्वरूप नगर, रेणुका नगर आणि विविध सोसायट्यांमध्ये मागील दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा अत्यंत विस्कळीतपणे सुरु आहे. त्यामुळे पाचगाव ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पाचगाव परिसरात महापालिकेकडून तब्बल ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे, पाण्याचे बिल वेळेत भरूनही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नळांना पाणी नसल्यामुळे दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. या पाण्याच्या प्रश्नावरून जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील यांनी आक्रमक होत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी संग्राम पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्र देऊन, तात्काळ पूर्वीप्रमाणे एक दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
तसेच पुढील ४ दिवसांच्या आत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास पाचगाव परिसरातील रहिवाशांच्यावतीने 'रास्ता रोको' करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला .