राजाराम तलावात तरुणाचा मृतदेह आढळला; राजारामपुरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
कोल्हापूर : सरनोबतवाडी येथील राजाराम तलावात शुक्रवारी सकाळी एका २० वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नातेवाईकांनी त्याला तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मृत तरुणाचे नाव विनीत बाजीराव मोहिते (वय २०, रा. कनान नगर, ई.पी. स्कूल कंपाऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास राजाराम तलावातील जाकवेलजवळ विनीत मोहिते हा पाण्यात तरंगताना दिसून आला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तलावातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, सकाळी ९ वाजण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी सीपीआर रुग्णालयाच्या डॉ. महानंदा यांनी राजारामपुरी पोलिसांना वर्दी दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, पुढील तपास राजरामपुरी पोलीस करत आहेत.