चांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानाची दुरवस्था...
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील सुमारे २५ वर्षांपूर्वी गावातील पोथी समाप्ती सप्ताहातून जमा झालेल्या लोकवर्गणीतून जवळपास दहा हजार रुपये खर्च करून सार्वजनिक कुस्ती मैदान उभारण्यात आले होते. गावाच्या कुस्ती परंपरेचा वारसा जपणाऱ्या मैदानाची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली असून त्याच्या सभोवताली अडगळीचे साहित्य टाकण्यात आले आहे.
एवढेच नव्हे, तर मैदानाच्या कठड्यालाच जनावरे वाहतूक करणारे टेम्पो उभे करून जनावरे चढवण्याचे प्रकार सुरू असल्याने कठडा अनेक ठिकाणी तुटला आहे. मैदानातील सोलर पोलही नादुरुस्त अवस्थेत असून संपूर्ण परिसर ओसाड झाला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामसभेत मैदानात कोणतेही साहित्य टाकण्यास बंदी, सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी डिजीटल सूचना फलक उभारणे, नियम मोडणाऱ्यांवर दोन हजार रुपयांचा दंड आणि माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला होता. मात्र आजतागायत या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पैलवान प्रकाश खोत यांनी या ऐतिहासिक मैदानाचे तातडीने जतन, दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
कुस्ती ही केवळ क्रीडा परंपरा नसून गावाच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याची भावना कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेतील ठरावाची तातडीने अंमलबजावणी करून मैदानावरील अतिक्रमण आणि गैरवापर थांबवावा, अन्यथा गावातील कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.