ते आले लोकांना त्रास देऊन गेले...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास...
कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या मंत्र्यांसह अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधी आज सकाळी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आणि मंदिर विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी मंदिरात आल्यामुळे जवळपास चार तास अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे परजिल्ह्यातून आणि परराज्यातून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ताटकळत उभे रहावे लागले. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांना वाटेत उभे रहावे लागले. शहरातील काही मार्ग वाहतूकीसाठी बंद राहिल्यामुळे अनेक वाहने ठिकठिकाणी बराच वेळ थांबवून राहिली होती. शिवाय अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व मार्ग वाहतुकीकरिता बंद केल्याने खरेदीसाठी महाद्वार रोडला आलेल्या लोकांना नाहक त्रास झाला. बहुतांश ठिकाणी केएमटी बससेवा दुपारपर्यंत बंद होती. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांच्यासह सर्वसामान्यांची गैरसोय झाली. आज दुपारपर्यंत कोल्हापूर शहरात सर्वत्र वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला होता. अनेक मार्ग बंद ठेवल्यामुळे आणि वाहतूक रोखल्याने ठीक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी कोल्हापुरात आलेल्या लोकांना देखील ठिकठिकठिकाणी झाडाखाली आणि दुकानांच्या पायऱ्यांवर बराच काळ ताटकळत बसावे लागले. सायंकाळनंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली.