गगनबावड्यातील अपघातात तरुणाचा बळी...गवा रेड्याच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

<p>गगनबावड्यातील अपघातात तरुणाचा बळी...गवा रेड्याच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप</p>

कोल्हापूर - गगनबावडा तालुक्यातील सांगशी गावातील संतोष मधुकर चव्हाण हे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला दुचाकीवरुन घरी जात असताना तहसिलदार कार्यालया समोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष चव्हाण यांच्या दुचाकीला गव्याने धडक दिल्यामुळेच हा अपघात झाला असून वनविभागाने पंचनामा करावा, अशी मागणी मयत संतोष चव्हाण यांच्या नातेवाईकांनी केली.

 मयत चव्हाण यांच्या नातेवाईकांनी, जोपर्यंत वनविभागाकडून पंचनामा होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव पाटणकर, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांनी वनक्षेत्रपाल अशोक राऊत यांच्यासह पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर वनक्षेत्रपाल राऊत यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघात झालेल्या परिसरात गव्यांच्या पायांचे ठसे आढळून आल्यामुळे अपघात झालेल्या परिसरात गव्यांचा वावर असल्याचे स्पष्ट होत असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची ग्वाही दिली. वनविभागाच्या या सकारात्मक भुमिकेनंतर चव्हाण कुटुंबियांनी शुक्रवारी दुपारी मयत संतोष यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गवा रेड्यांचा वावर असल्याने परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.