एनटीएने रिनीट नेली थेट अबुधाबीला...

नीट परिक्षेतला गोंधळ कायम...

<p>एनटीएने रिनीट नेली थेट अबुधाबीला...</p>

कोल्हापूर - वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन या क्षेत्रात करियर करु पाहणाऱ्या तब्बल साडेबावीस लाख विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची नीट ही प्रवेश परिक्षा घेणाऱ्या यंत्रणेतल्या गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तीन मे रोजी होणाऱ्या नीटचे पेपर फुटले आणि ही परीक्षा रद्द करावी लागली. यामुळे देशभरातील ही परिक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये अस्वस्थता पसरली. काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. परंतु याकडे दुर्लक्ष करत नीटची फेर परीक्षा घेताना परिक्षा केंद्रांवर पेपर पोहचवण्यासाठी लष्कराची मदत घेणे, परिक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम सारखे मेसेजिंग अॅप देशभरात बंद ठेवणे या सारखे हास्यास्पद निर्णय घेतले आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता फेर परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी परिक्षेपूर्वी एनटीएचा एक महा गोंधळ उघडकीला आला आहे. नागपूरमधील अब्दुल्ला तालिब या विद्यार्थ्याला एनटीएने जारी केलेल्या हॉल तिकीटावर परिक्षा केंद्राचा पत्ता चक्क अबुधाबी मधला छापण्यात आला आहे. चौदा जूनला ही चूक लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्याने एनटीएकडे तक्रार केली पण काल सायंकाळपर्यंत त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनाला आल्यानंतर अब्दुल्ला आणि त्याच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. हा प्रकार समाज माध्यमांसह माध्यमांमधून लोकांसमोर आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी एनटीए, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर एनटीएला जाग आली आणि एनटीएने अब्दुल्ला याला नागपूरमधील केंद्रावर परिक्षा देता येईल, अशी व्यवस्था केल्याचे जाहीर ले. ज्या विद्यार्थ्याने नागपूर, भंडारा आणि वर्धा या ठिकाणच्या परिक्षा केंद्रांचा पर्याय दिला होता. त्याच्या हॉल तिकिटावर थेट अबुधाबी मधील परीक्षा केंद्राचा पत्ता छापत एनटीएने घातलेला हा गोंधळ तांत्रिक असला तरी इतक्या संवेदनशील परीक्षेच्या व्यवस्थेत असे गोंधळ होतातच कसे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.