२१ जूनला राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद ; विविध राज्यातील विचारवंत, अभ्यासक उपस्थित राहणार

<p>२१ जूनला राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद ; विविध राज्यातील विचारवंत, अभ्यासक उपस्थित राहणार</p>

कोल्हापूर - येत्या रविवारी २१ जून रोजी राजर्षी शाहू सलोखा मंचच्यावतीने कोल्हापूरात राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या परिषदेत विविध राज्यांमध्ये शाहू कार्याविषयी नेमकी स्थिती काय आहे,  तसेच शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार देशभर पोहचवण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत चर्चा केली जाणार आहे. सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

 दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात एकवीस जूनला सकाळी ११ वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश मधील छत्रपती शाहूजी संस्थानचे अध्यक्ष अॅड. नंद वर्मा, कुर्मी समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास पटेल, लखनौचे डॉ.डी. के. वर्मा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ज्येष्ठ समाजसेवक जे.एन. कटियार, डॉ. माधुरी चौगुले, डॉ. पद्मा पाटील, राजेश कुमार यांच्यासह विविध राज्यातील विचारवंत, अभ्यासक उपस्थित राहणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

या पत्रकार बैठकीला सलोखा मंचचे सहनिमंत्रक बबन रानगे, सचिव संजय कांबळे, शशिकांत पाटील, सुखदेव बुध्ध्याळकर, बाळासाहेब भोसले, शिवमूर्ती झगडे, आकाश शेलार, महेश मछले, अनिल गिरी आदी उपस्थित होते.