कोल्हापुरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

<p>कोल्हापुरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई</p>

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणांमुळे भाविकांना होत असलेल्या अडचणींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी नुकतीच पाहणी केली होती.

त्यानंतर महाद्वार रोड आणि जोतिबा रोडवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक २ आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक आणि जोतिबा रोड परिसरात कारवाई केली. यामध्ये अनधिकृत फेरीवाले, फुल विक्रेते आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर धडक मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान मंदिर परिसरातील फुल विक्रेत्यांचे तेरा, बेंटेक्स दागिन्यांचे तीन आणि ओटी विक्रेत्यांचे पाच स्टॉल हटवण्यात आले. महापालिकेच्या ठरावानुसार अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेलं साहित्य संबंधितांना परत न देता महापालिकेकडे राहणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने मोहीम अधिक तीव्र केली असून, संबंधितांनी अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण, अग्निशमन दल, विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचारी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.