संपूर्ण देश हलाल मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणार : हिंदू जनजागृती समिती
कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघाने घेतलेल्या हलाल प्रमाणपत्रावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. ज्या "जमियत उलेमा ए हिंद" या खासगी संघटनेकडून हलाल प्रमाणपत्र दिले जाते. ती संघटना मुळात देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना आर्थिक पाठबळ देते, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. हलाल प्रमाणपत्र देणारी "जमियत उलेमा ए हिंद" ही संघटना ७०० हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवून त्यासाठी पैसा खर्च करत असेल तर अशा संस्थेच्या हलाल प्रमाणपत्राची गरज काय? असा सवाल हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार बैठकीत उपस्थित केला आहे.
जगातील १९३ देशांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणला मान्यता दिली आहे तर मग भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्राला आपण मान्यता का देतो ?, एक खाजगी संघटना धर्माच्या आधारावर हलाल प्रमाणपत्र कशी काय देऊ शकते ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून "जमियत उलेमा ए हिंद" ही संघटना आपल्या देशात धर्माच्या आधारावर एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करतंय, असा आरोप करत, संपूर्ण देश हलाल मुक्त करण्यासाठी आपण न्यायालयीन लढाई लढतच राहू, असा इशारा रमेश शिंदे यांनी दिला आहे.
या पत्रकार बैठकीला हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी, हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, निरंजन शिंदे, योगेश केरकर, संभाजी भोकरे उपस्थित होते.