मतमोजणी केंद्रात ‘भानामती’ची एन्ट्री! लिंबू-उदबत्ती सापडल्याने खळबळ; चित्रपट महामंडळाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

<p>मतमोजणी केंद्रात ‘भानामती’ची एन्ट्री! लिंबू-उदबत्ती सापडल्याने खळबळ; चित्रपट महामंडळाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष</p>

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज कोल्हापुरात सुरू असतानाच मतमोजणी केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला. केंद्रातील एका खुर्चीवर लिंबू आणि उदबत्ती आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे काही काळ चर्चांना उधाण आले असून, ‘भानामती’चा प्रकार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महामंडळाच्या निवडणुकीसाठी काल उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील पाच केंद्रांअंतर्गत असलेल्या 12 मतदान केंद्रांवर एकूण 1,698 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुमारे 49 टक्के मतदानाची नोंद झाली असून निवडणुकीत चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले.

आज सकाळपासून कोल्हापुरातील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र मतमोजणीपूर्वीच केंद्रातील एका खुर्चीवर लिंबू आणि उदबत्ती आढळल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 17 जागांपैकी 3 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या समर्थक पॅनेलची लढत आनंद काळे – सतीश रणदिवे यांच्या पॅनेलशी होत आहे. तर संतोष शिंदे आणि संग्राम भालकर हे दोन अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.

तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मतमोजणी केंद्रावरील ‘लिंबू-उदबत्ती’ प्रकरणाने निवडणुकीला वेगळेच नाट्यमय वळण मिळाले आहे.