शिवाजी विदयापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

<p>शिवाजी विदयापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण</p>

कोल्हापूर - महात्मा बसवेश्वर आणि शिवशरणांच्या मानवतावादी, समतावादी तसेच श्रमप्रतिष्ठेच्या विचारांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, या अध्यासनासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देत कामाला अधिक गती देण्याचे आश्वासन दिले. बसवेश्वर महाराजांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अध्यासन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सुरू झालेल्या या अध्यासनामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल, बसवेश्वर महाराजांचा इतिहास आणि विचार देशासह जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी, या प्रकल्पासाठी मिळालेल्या भरीव निधीबद्दल शासनाचे आभार मानले. शरण साहित्य अध्यासनातून मांडण्यात आलेल्या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सरलाताई पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, विद्यापीठातील विभागप्रमुख, कर्मचारी, ठेकेदार आणि मान्यवर उपस्थित होते.