शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा नवीन राजवाड्यात पारंपारिक शाही थाटात साजरा होणार
कोल्हापूर – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२ वा राज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा शनिवारी सकाळी ७.४५ ते १०.०० या वेळेत नवीन राजवाड्यात दरबार हॉलमध्ये पारंपरिक शाही थाटात साजरा केला जाणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक होणार आहे. सोहळ्यास खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी शाहिर विशारद आझाद नायकवडी यांचा पोवाडा, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे व्याख्यान, समूह गीत सादरीकरण होणार आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून समस्त करवीरकरांसाठी मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण शुक्रवार सायंकाळी 6.30 वाजता भवानी मंडप येथे होणार आहे.
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा मिलिटरी बँड हा भारतीय सैन्यातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित बँडपैकी एक आहे. या बँडने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे. त्यामध्ये राष्ट्रपती भवन, प्रजासत्ताक दिन संचलन, अमर जवान ज्योती, राजस्थान दिवस तसेच गाझा येथे संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन दलासमोरील कार्यक्रमांचा समावेश आहे.