कागलमध्ये पाणी टंचाईचे संकट...

दर सोमवारी राहणार पाणीपुरवठा बंद

<p>कागलमध्ये पाणी टंचाईचे संकट...</p>

कोल्हापूर - कागल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटली आहे. त्यामुळे २७ एप्रिल पासून दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच इतर दिवशीही पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपरिषदेकडून नागरिकांना पाण्याचा काटकसने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नळाला तोटी लावणे, पाणी भरल्यानंतर लगेच बंद करणे, पिण्याचे पाणी वाया जाऊ न देणे, आणि पाण्याच्या टाक्यांवर फ्लोटिंग व्हॉल्व बसवणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नळाला मोटार लावून पाणी उचलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव टाकू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य आणि जपून वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.