इचलकरंजीत कचऱ्याचे ढीग साचल्याने मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा उपमहापौरांचा इशारा
इचलकरंजी - शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे, यासाठी सर्व स्तरातून काम सुरु आहे. शहरातील कचरा उठाव करण्यासाठी मक्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. करोडो रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे. मात्र मक्तेदारांकडून कचरा उठाव होत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी शहराची पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळाले. मक्तेदाराने कचरा उठाव न केल्यामुळे महापौर आणि उपमहापौर चांगलेच संतापले. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या यांनी मक्तेदाराला फोन लावून चांगलेच खडे बोल सुनावले आहे. काम करत नसल्याने लवकरच तुम्हाला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. करोडो रुपयाचे टेंडर घेऊनही मक्तेदार शहरातील कचरा उठाव करत नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.