कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातल्या १०८ मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण

<p>कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातल्या १०८ मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण</p>

कोल्हापूर – शहरातील तावडे हॉटेल चौक ते गांधीनगरमधील १५८ एकरपर्यंतचा परिसर कोल्हापूर महापालिकेच्या मालकीचा असून १९४५ पासून याची नोंद आहे. या क्षेत्रात एकूण १३३ गटांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीचा दावा फेटाळत जैसे थेचे आदेशही रद्द केले. यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व्हेचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील आणि कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच पथकांमार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी १०८ मिळकतींची मोजमापे पूर्ण करण्यात आली आहेत. जुन्या आणि नवीन बांधकामांची लांबी-रुंदी मोजण्यात आली आहे. तसेच मूळ स्थितीमध्ये झालेले बदल याचीही माहिती संकलित केली जात आहे.

या सर्व्हेसाठी सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले यांची मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपशहर रचनाकार एन. एस. पाटील सहाय्यक नियंत्रण अधिकारी आहेत. पाच स्वतंत्र पथकांद्वारे हा सर्व्हे सुरू असून सोमवारपर्यंत याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.