लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी 2 कोटीवरून 1 कोटींवर... 80 लाख महिला अपात्र
मुंबई - राज्यात जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. आता ती कमी होवून 1 कोटी 66 लाखांवर पोहचली आहे. ई-केवायसीच्या नावावर सध्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी, दादा, भाऊ, भाई म्हणणारे नेते आता कुठे गेले आहेत? अशी टीका केली आहे.
काही महिलांनी ई केवायसीचे पर्याय निवडताना चूक केल्याने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अर्थ मंत्रालय ज्यांच्याकडे आहे, त्या फडणवीसांनी, सोलो बॅनर लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी याची उत्तरे दिली पाहिजे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी लाडकी बहीण योजनेत अपात्र केलेल्या महिलांच्या बाजुने सरकारला प्रश्न विचारले आहेत.