मराठा आंदोलक मनोज जरांगे दवाखान्यात दाखल...
बीड – मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. यावेळी ते रखरखत्या कडक उन्हात उपोषणाला बसले होते. काल रात्री त्यांची अचानक तब्येत खूप खालावली होती. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली दरम्यान जरांगे आणि नेत्यांमध्ये चर्चा झाली.यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले असून अधिक उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी विखे पाटलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला देत जरांगे म्हणाले, विनाकारण बडबड करायला नको. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मला तेच सांगितले की, जर घाईगडबडीत निर्णय घेतला तर पुन्हा लोक अंगावर येतील. मग जर सरकारला जीआर (शासकीय निर्णय) काढायचाच होता, तर आधी अभ्यास करून का काढला नाही? आता सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे, त्यामुळे आम्ही एक महिना थांबण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहेत.
जरांगे पाटील यांनी कडक उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा लढू, असे म्हणत जरांगे यांनी सोमवारी राज्य सरकार जीआर काढणार असून कोणीही नाराज होवू नये, असे म्हटले आहे.