टीईटी परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्रक जारी...परीक्षार्थींचा तीव्र संताप 

<p>टीईटी परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्रक जारी...परीक्षार्थींचा तीव्र संताप </p>

पुणे – राज्यात उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक पत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परीक्षार्थींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  


परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे कि,  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा  २०२६ (टीईटी) घेण्याचे प्रस्तावित होते. नीट २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज (२७ जून)  पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेब‌द्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड टाकली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या  जून २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने आणि  याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.शिक्षक पात्रता परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.