अवैध भेसळयुक्त ताडी वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर - कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत ते लक्ष्मी टेकडी मार्गावर एका वाहनातून अवैध भेसळयुक्त ताडीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकाने सापळा रचत मंगळवारी सकाळच्या सुमाराला हॉटेल पल्लवी परिसरात संशयित वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनामध्ये सहा निळ्या आणि दोन पिवळ्या रंगाच्या कॅनमध्ये भरलेली सुमारे २८० लिटर भेसळयुक्त ताडी आढळून आली. ही भेसळयुक्त ताडी, मोबाईल फोन आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ५ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच साकेत प्रदीप बोर्लीकर आणि नितीन बाजीराव माने या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तिच्यामध्ये भेसळ असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या भेसळयुक्त ताडीचे सेवन केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक शंकर आंबेरकर या प्रकरणी अधिक तपास करत आहे.