शक्तीपीठ महामार्गातून खिसे भरण्याचा एकच उद्देश : आ. सतेज पाटील यांचा हल्लाबोल
कोल्हापूर - शक्तीपीठ महामार्ग हा जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम सरकार करत आहे. कॉन्ट्रॅक्टरचे कमिशन या व्यतिरिक्त या महामार्गाची उपयोगिता काहीच नाही. यातून खिसे भरण्याचा एकच उद्देश या सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा असल्याचा हल्लाबोल आ.सतेज पाटील यांनी केला आहे . शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काढलेल्या विराट मोर्चा वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आ. सतेज पाटील म्हणाले कि, सव्वा दोन वर्ष झालं आंदोलनाची धार वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वपक्षीय करतोय. अकरा नद्या ओलांडून हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येतोय. या नद्यांवर असणारी गावं आणि मंदिरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावेळी भाजपचे हिंदुत्व कुठे गेला आहे ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.या महामार्गामुळं किमान दीड - दोनशे मंदिरांना फटका बसणार आहे. त्याचबरोबर या महामार्गाच्या पाच-दहा किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या गावांना पुराचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा गरज नसलेला महामार्ग आहे, असे ते म्हणाले.