उद्योजक, व्यापाऱ्यांच्या मागण्या जीएसटी कौन्सिलपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सकारात्मक : मुख्य आयुक्त नीरज कन्सल
कोल्हापूर – उच्च जोखीम श्रेणीत चुकीने समाविष्ट झालेल्या करदात्यांच्या प्रकरणांना प्राधान्याने हाताळले जाणार आहे. त्याचबरोबर उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या जीएसटी कौन्सिलपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी केले.
कोल्हापुरातील सीजीएसटी कार्यालयात उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील जीएसटी व कस्टम्स संदर्भात समस्या, सूचना आणि अपेक्षांवर मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते कन्सल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य आयुक्त नीरज कन्सल यांनी सांगितले की, जीएसटी अपील प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील वरिष्ठ अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापूरला भेट देणार आहेत. तसेच भविष्यातील इन्कम टॅक्सप्रमाणे जीएसटी अपिलेट सुद्धा फेसलेस करण्याबद्दल सकारात्मक आहे. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. कमी जोखीम श्रेणीतील करदात्यांचे रिफंड अधिक वेगाने मंजूर करण्यासाठी निर्देश देण्यात आले असून, पोचपावतीच्या दिवशीच ९० टक्के तात्पुरता रिफंड मंजूर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कस्टम्स विभागात आधुनिक ‘कस्टम्स इंटिग्रेटेड सिस्टम’ (CIS) विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सचिन शिरगावकर, कुशल सामाणी, आदित्य बेडेकर, वीरेंद्र पाटील, अजित कोठारी, विज्ञान मुंडे यांच्यासह विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी जीएसटी रिफंड, अपील प्रक्रिया, ई-वे चलन, जीएसटी कॉम्प्लायन्स आणि तांत्रिक अडचणींबाबत माहिती दिली.
यावेळी सीजीएसटी आयुक्त सुमित कुमार यादव, अपर आयुक्त प्रसाद डी. गोरसे, अपर आयुक्त सबरीश जी., संयुक्त आयुक्त रोहित जोशी, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, आय एफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सतीश कडुकर, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे बळीराम वराडे, सी ए गिरीश कुलकर्णी, क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत, सीए गिरीश कुलकर्णी आणि विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.