गॅसच्या किंमती वाढवणे हा सरकारचा नाईलाज : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
मुंबई – पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दर वाढीमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गॅस दर वाढीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एलपीजी गॅसच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या अडचणींबाबत चिंतेत आहोत, परंतु सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये गॅसच्या किंमती वाढवणे हा सरकारचा नाईलाज असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, "गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्यामुळे आम्हालाही दुःख आणि खेद आहे. मात्र, यावर टीका करण्यापूर्वी लोकांनी जगातील सद्यस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्या संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. जगभरात मालाची वाहतूक आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. एलपीजी गॅस आता अत्यंत मर्यादित ठिकाणांवरून उपलब्ध होत आहे. गॅसची मूळ किंमत वाढली आहे. शिवाय, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आता तब्बल 40 ते 45 दिवस लागत आहेत, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि विम्याचा खर्च कमालीचा वाढला आहे."