महागाई आणि पेन्शन योजनेतील अडचणींविरोधात इचलकरंजीत निदर्शने...
कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणून इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार पेन्शन योजनांसाठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवावी, अन्नसुरक्षा योजनेची उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत करावी, हातकणंगले तालुक्यातील रेशन दुकाने तातडीने सुरू करावीत, तसेच कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात आदि मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात कॉम्रेड चंद्रकला मगदूम, मुमताज हैदर, विकास पाटील, सदा मलाबादे आप्पासो परीट, अनिल जंगले, उत्तम साळुंखे आदि सहभागी झाले होते.