पुरवठा विभागाकडून अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त... शिवाजी पेठ परिसरातील घटना
कोल्हापूर - शहरातील शिवाजी पेठ येथील महाकाली मंदिर परिसरामधील अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा जिल्हा पुरवठा विभागाने उद्ध्वस्त केला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करण्यात येत होता. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत गॅस भरण्याच्या मोटारी, सिलिंडर्स आणि डिजिटल क्यूआर कोडसह सुमारे 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावेळी घटनास्थळावरून राजेंद्र चंद्रकांत मस्के (वय ४८, रा. लक्षतीर्थ वसाहत) आणि स्वप्निल शिंदे (वय १८ वर्ष) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जुना राजवाडा पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.