भाऊसिंगजी रोडवर 30 तोळे सोन्याचे दागिने लंपास
कोल्हापूर : शहरातील गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड परिसरात दोन चोरट्यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रंकाळा टॉवर परिसरात वास्तव्यास असलेले समीर सुधीर पात्रा हे बंगाली कारागीर गेली वीस वर्षे सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसर करण्याचे काम करतात. गुजरीतील व्यापाऱ्यांकडून सोनं घेऊन दागिने तयार करून देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी एका व्यापाऱ्याचे ३० तोळे सोन्याचे दागिने पोहोचवण्यासाठी त्यांचा मुलगा सुबोधित समीर पात्रा (वय १८) हा निघाला होता.
भेंडे गल्लीमार्गे भाऊसिंगजी रोडवर येत असताना गणपती मंदिराजवळ एका व्यक्तीने त्याला अडवले. संबंधित व्यक्ती बंगाली भाषेत बोलत असल्याने सुबोधित त्याच्याशी संवाद साधत पुढे गेला. गोल्ड सिल्वर पॅलेस परिसरात त्याचा दुसरा साथीदारही आला. दोघांनी सुबोधितला बोलण्यात गुंतवत त्याच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून क्षणार्धात पलायन केले. घटनेची माहिती मिळताच सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून संशयितांचा शोध सुरू आहे. गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.