महिला बालकल्याण मंत्री वेळ काढून मंगेशकर रुग्णालयाला जाब विचारण्याचे कष्ट घेतील का ? : सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल
मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी, ट्वीट करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार झाल्याचे म्हणत,सहा वर्षाच्या चिमुरडीचा शस्त्रक्रियेदरम्यान जीव गेल्याचे म्हटले आहे. यावर महिला बालकल्याण मंत्री वेळ काढून मंगेशकर रुग्णालयाला याचा जाब विचारण्याचे कष्ट घेतील का ?, असा सवाल त्यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे कि, प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षाच्या चिमुरडीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणले होते. रुग्णालयाने सांगितले की, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत मुलीला तुम्ही शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करू शकता. ठरल्याप्रमाणे मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडण्यात आला अचानक मुलीला रक्ताची उलटी सुरू झाली. पालकांना कल्पना न देता मुलीला तातडीने आयसीयू मध्ये हलवण्यात आलं. अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे सांगितले. मात्र काही वेळातच मुलीने प्राण सोडला.
हा घडलेला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शवविच्छेदनासाठी प्रेत स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रकरण पोलिसांमध्ये गेले. पण पोलिसांनी पुन्हा नवा पवित्रा घेतला शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाहीत.
आता शेवटचे, शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखीव ठेवण्यात आले आहे. ....अखेर प्रश्न दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आहे.
हो हे तेच रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसे याचं बाळ गेलं आणि त्यानंतर दोष तनिषा भिसेचाच कसा आहे हे सांगण्यात चाकणकर बाईंपासून झाडून सगळी यंत्रणा कामाला लागली. हो हे तेच मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये मागच्याच महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येऊन गेले. एवढ्या मोठ्या दवाखान्या विरुद्ध पोलीस सहजासहजी तक्रार कशी दाखल करून घेतील ?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.