देशव्यापी बंदमध्ये सहभागी होत कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर - औषध विक्री व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० आणि रूल १९४५ अंतर्गत चालतो. मात्र, ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नसल्याचे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते, मात्र त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली असूनही देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आज एकदिवसीय देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदमध्ये सामील होत कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून सुरु झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. काळ्या फिती लावून हजारो औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते.
ऑनलाईन औषध विक्री, औषधांवरील आकर्षक ऑफर्स, बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर, तसेच बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा धोका वाढत असल्याची चिंता औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच नशेच्या औषधांचा वाढलेला गैरवापर रोखला जावा आणि ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी ऑनलाईन फार्मसीचा ड्राफ्ट मागे घ्यावा, कोरोना काळात तयार करण्यात आलेले होम डिलिव्हरी गॅजेट तात्काळ रद्द करावे, अशा मागण्या महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव आणि कोल्हापुर केमिस्ट असोसिअशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना असोसिएशनच्यावतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव आणि जिल्हा अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, मोहन ढेरे, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मगदूम, संदीप मिसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि औषध दुकानदार उपस्थित होते.
दरम्यान बंदमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील औषध विक्री व्यवसाय आज ठप्प झाला होता. बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने असोसिएशनच्या सहकार्याने कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यात तालुकानिहाय काही औषध दुकाने सुरु ठेवली होती. त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला होता.