भाचीला वाचवताना मामाच नदीत बुडाल्याची भीती; भोगावती नदीत गुरुवारी शोधमोहीम

<p>भाचीला वाचवताना मामाच नदीत बुडाल्याची भीती; भोगावती नदीत गुरुवारी शोधमोहीम</p>

वाकरे : भाचीला पोहायला शिकवताना तिचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या मामाचा भोगावती नदी पात्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. रमेश मारुती खैरे-बुरुड (वय ४०) असे बेपत्ता झालेल्या मामाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश खैरे हे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपली भाची रोहिणी दिपक सूर्यवंशी (रा. पलूस) हिला पोहायला शिकवण्यासाठी भोगावती नदीकाठी घेऊन गेले होते. अलीकडील पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली असून प्रवाहही वेगवान झाला आहे.

रोहिणीच्या कमरेभोवती सुरक्षिततेसाठी प्लास्टिकचा डबा बांधण्यात आला होता. मात्र नदीत उतरल्यानंतर अचानक तो डबा निसटल्याने रोहिणी पाण्यात बुडू लागली. भाचीचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच रमेश यांनी तत्काळ तिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी रोहिणीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र या प्रयत्नात ते स्वतः खोल पाण्यात गेले आणि जोरदार प्रवाहामुळे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

ही घटना सायंकाळी उशिरा घडल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. मात्र अंधार आणि नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे रात्री शोधकार्य करण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गुरुवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नदीकाठावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे वाकरे परिसरात शोककळा पसरली आहे.